उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी!



उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle) - लेखन, संकलन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच)

[शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित, दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्यात काम करीत असताना खूप दिवसाची तळमळ होती, नाटकात काम करणार्‍या कलाकारांना घेवून पदभ्रमणाच्या मोहीमा आखाव्यात. ही गोष्ट मी एका प्रयोगाच्यावेळी श्रीमंत बाबासाहेब व ठाणे कलाकार व्यवस्थापक श्री. अरुणराव ठाकूर यांच्यापाशी बोलून दाखवली. कल्पना आवडताच लगेचच त्यांनी संमती ही दिली. मग बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, अरुणरावांच्या मार्गदर्शनाने व सहकलाकार मनीषराव नाखवा याच्या सहकार्याने पदभ्रमणाची सुरुवात म्हणून नाटकात न दाखविलेल्या प्रसंगापैकी ’उंबरखिंड (Umberkhind Battle)’ या समरभूमीला भेट देण्याचे ठरले. त्या दिवशी तारीख होती ६ फेब्रुवारी २०११ आणि सभासद संख्या होती १५, त्याचा हा वृतांत .........]

या लेखात येणारी पात्रे आपली ऐतिहासिक पार्श्र्वभूमी घेऊन येत असल्यामुळे हा लेख बराच विस्तृत झाला आहे. परंतु त्यामुळे वाचकांना सखोल माहिती मिळेल हे नक्कीच…….

उंबरखिंडीचा मार्ग

मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा रेल्वे  स्थानकाच्या नैऋत्येस साधारण ७/८ किमी. अंतरावर कुरवंडे हे गांव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर असलेल्या या गावातील वस्ती ५०-६० उंबरठ्यांची, पण तसं हे गाव जुनं फार वर्षांपूर्वी वसललेलं. तेथील ग्रामदेवतेच्या मंदिरात, प्रांगणात असलेल्या देवादिकांच्या मूर्त्या व इतरस्त विखुरलेले शिल्पीत भग्न दगडी अवशेष याची साक्ष पटवून देतात. देवळाबाहेरील एका झाडाखाली विसावलेले गजांतलक्ष्मीचे शिल्प आपले लक्ष वेधून घेते. या शिल्पाकृतीचा उगम अतिप्राचीन आहे. जातककथेत भगवान गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळेस त्यांची आई मायावती हिला एक स्वप्न पडले. मध्यभागी ती पद्मासन अवस्थेत बसलेली असून, तिच्या दोन्ही बाजूस दोन शुभ्र हत्ती आपल्या सोंडेने थंड व उष्ण जलाने भरलेले घट घेऊन तिला स्नान घालीत आहेत. या प्रसंगाची आठवण ठेवीत त्या स्वप्नाचे पुढे शिल्प साकारले गेले. बौद्धकाळानंतर हिंदूधर्माचा पुनरूद्धार झाला. त्यांनी हेच शिल्प स्विकारले. मात्र वैष्णव संप्रदायाने मायावतीच्या जागी 'लक्ष्मी' आकारली ज्यामुळे या शिल्पाचे नामकरण झाले ‘गजलक्ष्मी'. तर शैव संप्रदायाने मायावतीच्या  किंवा लक्ष्मीच्या जागी 'गौरी' आकारून त्या शिल्पाकृतीस 'गजगौरी' असे नाव दिले. काहीही असले तरी सांप्रत काळात या शिल्पाला 'गजांतलक्ष्मी' असेच म्हणतात.

कुरवंडे गावाला भेट देऊन झाली की आपण मुख्य मार्गी लागायचे. त्याकरिता गाव मागे ठेवत पश्चिमेला चालत असताना पठार चढण्यापूर्वी उत्तरेकडे म्हणजे उजवीकडे सरकायचे. कारण उंबरखिंड (Umberkhind Battle) परिसर भौगोलिकदृष्ट्या उंचावरून न्याहाळल्यास अधिक अभ्यासपूर्वक होईल. थोडे अंतर चालून गेल्यावर उजव्या हाताकडील शेताडी सोडून डावीकडच्या डोंगराशी सलगी करायची. हा डोंगर म्हणजे डचेस नोज किंवा धाकटी नागफणी. डचेस नोजची सोप्पी चढण चढून टोकापर्यंत आल्यावर डाव्या हाताला दिसतो ३०० फूट उंच असलेला नागफणी किंवा ड्युक्स नोजचा (Dukes Nose) छातीत धडकी भरवणारा भव्य व उत्तुंग असा कडा. इंग्रजी हॉरर चित्रपटातील नागासारखा फणा उभारलेला हा नागराज आता आपल्याला डंख तर मारणार नाही ना? असा क्षणभर आपल्याला भास होतो. याचे येथून दर्शन होणे हे म्हणजे हात शिवशिवणाऱ्या गिर्यारोहकांसाठी आव्हानच. आता आपण ड्युक्स नोजच्या माथ्यावर चढून जाण्यासाठी थोडेसे साहस करायचे. ड्युक्स व डचेसची काताळ भिंत जिथे एकमेकांस भिडते तेथवर डचेसला सावधपणे वळसा मारून पोहोचायचे. इथे एक खिंड तयार झाली आहे. या खिंडीतून वर जाण्यासाठी आपल्याला प्रस्तरारोहणाचे अवगत असलेले ज्ञान पणाला लावून खिंड चढायची. वर आल्यावर ‘’हुश्श, सुटलो बुवा एकदाचे’’ म्हणायचे आणि ड्युक्स नोजच्या माथ्यावर जाण्याकरिता उजवीकडे वळायचे. ड्युक्स नोजच्या माथ्यावर नागमणी शोभावा अशी घुमटी आहे.

नागफणीच्या माथ्यावरून समोरच काहीसा तटस्थ राहिलेला कर्नाळ्याचा सुळका, उत्तरेला राजमाची, मांजरसुंभा, ढाक बहिरीचे पठार याच डोंगररांगाना आडवा छेदत जाणारा मुंबई-पुणे लोहमार्ग. घाटांना पीळ देत वळणावळणांचा एक्सप्रेस हाय-वे, पूर्व दिशेस लोहगड, विसापूरची जोडी आणि ‘भिऊ नकोस’ म्हणत त्याची पाठराखण करणारा भातराशीचा डोंगर. त्यापुढे ‘आता आभाळ फक्त दोन बोटेच उरलंय’ असे सांगणारे तुंग गडाचे टोक', त्याच्या बाजूस ‘भूमितीची’ आठवण करून देणारा तिकोना. दक्षिणेस कोरीगड, पाणडोंगराचा परिसर असे हे आसमंतात दिसणारे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी आकाश मात्र निरभ्र हवे. अश्या या सह्याद्रीच्या डोंगररांगा पहात असताना पश्चिम दिशेस असलेल्या तळकोकणात आपली नजर स्थिरावते. हिरवीगार वनश्री, उत्तरेला उगम पावून उजवीकडे वळण घेत पश्चिमेला मार्गस्थ झालेली अंबा नदी. त्याच्या काठावरील चावणी गाव आणि ज्यासाठी आपण इथवर आलो ती उंबरखिंडीकडे जाणारी वाट न्याहाळता येते.

हा सगळा प्रांत पाहून झाला की ड्युक्स नोजच्या डोंगर उतारावरून पठारावर यायचं. मघाशी आपण जे कुरवंडे गाव सोडलं त्या दिशेला पाठ करून उभे राहिले की डाव्याहाती गावाच्या हद्दीला लागूनच आय्.एन्.एस्. शिवाजी (INS SHIVAJI)या भारतीय नौदलाचा भाग लागतो. येथून दक्षिण दिशेकडे चालत असताना वाटेत विटांची आडवी भिंत लागते येथे नौदल जवानांच्या नेमबाजीचं प्रशिक्षण चालतं. पुढे गेलं की आपण एक खिंडीच्या माथ्यावर येतो. समोर दक्षिणेकडे टोक उंचावून दिसतो तो मृगगड आणि ज्या खिंडीच्या मुखावर उभे आहोत ती टायगर लीप. टायगर लीप तीन खिंडीनीं मिळून बनलेली आहे. ती कशी? ते पाहण्यासाठी ही खिंड उतरायला हवी. खिंड उतरुन खाली गेलो की डावीकडे आणि समोर अशा दोन खिंडी दिसतात. त्यापैकी मधल्या खिंडीतून शिवसागर जलाशयाचे पाणी पाझरत असते. पावसाळ्यात हा जलाशय दुथडी भरुन वाहतो. अश्यावेळी त्याचे पाणी बांधावरून उड्या टाकत टाकत खाली येते. म्हणून हिला वाघ उडी (Tiger Leap)असं सुद्धा म्हणतात. समोरची खिंड चढून गेलो की आपण आय्.एन्.एस्. शिवाजीच्या (INS SHIVAJI) आवारात प्रवेश करतो. हा  संपूर्ण परिसर भारतीय नौदलाच्या संरक्षित क्षेत्रात येत असल्यामुळे इथं फिरायला परवानगी नाही. त्यामुळे आपण ज्यासाठी आलोत त्या उंबरखिंडीचाच विचार केलेला बरा.

ड्युक्स नोजच्या पायथ्याकडील पठारावरुन पश्चिमेकडे जाताना थोड्या अंतरावर ऐन उतरणीवरील झाडावळीत कातळात खोदलेल्या दोन पाणटाक्या लागतात. सध्या या टाक्या उतरणीवरून वाहून आलेल्या माती-मलब्यामुळे बुजल्या आहेत. त्याच्या दगडी काठावरून इथं पाण्याच्या टाक्या आहेत हे कळते. यावरून पूर्वीपासून तेथे असलेली वाट निश्चित वहिवाटीत होती. इतिहासात याचे काही पुरावे देखील उपलब्ध आहेत. पंधराव्या शतकात रशियन प्रवासी अफनासी निकितीन हा चेऊल (चौल) बंदरात उतरून, पिंप्री घाट चढून देशावर जुन्नरला चोवीस दिवसांच्या प्रवासानंतर पोहोचला. निकितीन आपल्या नोंद वहीत लिहितो, 'मी चौलला उतरून आपला घोडा बरोबर घेऊन प्रथम पालीस गेलो व तिथून उंबरखिंडीने वर चढून पवनेच्या खोऱ्यात उतरलो. तिथून उत्तरेकडे सरकून इंद्रायणी ओलांडून नवलाख उंबऱ्यास आलो व तिथून सहा दिवसांनी जुन्नरास पोचलो’. त्यानंतर दोन शतकांनी सन १६७२ मध्ये मुंबईचा फ्रायर नावाचा इंग्रज जुन्नरच्या सुभेदाराच्या बायकोला औषध देण्यासाठी  या उंबरखिंडीवाटे जुन्नरला सात दिवसांच्या प्रवासानंतर पोहचला. याशिवाय ग्रीक, रोमन, अरबी, इराणी असे अनेक देश-विदेशातील प्रवासी व व्यापारी याच मार्गांनी आले व गेले असतील. या पाणटाक्या पुढे शेंदूर लेपलेला दगड ठेवलेला आहे. बहुदा ही मातृका असावी का? कारण पाणी साठवण्याच्या ठिकाणी मातृका किंवा आसरा असतात असे आपण मानतो. काही का असेना पण शेंदूर लावलेल्या या दगडामुळे आंबेनळीतून चावणी गावात उतरणारी वाट लक्षात राहते.

उंबरखिंडीत कुरवंडा घाट मार्गे तळकोकणात उतरण्यासाठी दोन वाटा आहेत. एक (डाव्या हाताला) आंबेनळीची वाट व दुसरी (उजव्या हाताला) भोवणी डोंगराची वाट. आंबेनळीची सोपी व बऱ्यापैकी मळलेली वाट टेपी-चिमादेवीच्या डोंगरातून निर्गुडदऱ्यावाटे खाली उतरते. व तळातून वाहणारी अंबानदी ओलांडून चावणी गावास येऊन मिळते. सध्या ही वाट गॅस पाईप लाईनमुळे सिमेंटची करून टाकलेली आहे. आजही या वाटेनं गावकरी व गुरंढोरं चढउतार करतात. तर दुसरी कुरवंडा घाटातील हद्दीतून येणारी वाट भोवणी डोंगराच्या कण्यावरून अरुंद डोंगरसोंडेनं धनगर वाडीत उतरते व तिथून पुढे चावणी गावास येऊन मिळते. भोवणीची सोंडवाट उभी तीस अंश उताराची, गर्द झाडीची, अतिशय दुर्गम, वळणावळणाची, चिंचोळीवजा अरुंद व निसणीची. एका वेळी एकच माणूस उतरू शकेल अशी. तीव्र उतारामुळे या वाटेवर उतरताना थांबता येत नाही. उतरताना भोवळ येते म्हणून या डोंगराचं नाव भोवणी डोंगर. वरील दोन्ही वाटा चावणी गावास येऊन मिळत असल्यामुळे मनास भावेल त्या वाटेनं खाली उतरावं. खाली आलं म्हणजे आपण दोन हजार फूट उंचीवरून एकदम तीनशे फुटांवर येऊन थडकलेलो असतो. याचा अर्थ आपण सतराशे फूट उंची उतरलेलो असतो. चावणी गावात बहुधा कारतलबखानाचा तळ डेरेदाखल झाला असावा. त्याची छावणी इथं पडली. पुढे या शब्दाचा अपभ्रंश 'चावणी' असा झाला असावा. चावणी गावातून निघालेल्या पायवाटेने जाताना डाव्या हाती उत्तरेकडून येणारी अंबा नदी सोबत करीत असते. वाटेत उजवीकडे सखूची ठाकरवाडी. त्यापुढे वस्ती सोडून डावीकडे स्मशानभूमी. मग त्या पुढील भाग उंबरखिंडीचा सुरू होतो.

उंबरखिंडीच्या जंगलातून कमी चढ-उताराचा व वळणावळणाचा रस्ता किर्रऽऽ झाडीतून गेला आहे. त्याची लांबी पाच-सहा मैल असावी. एव्हाना चालून चालून पायाला गोळे यायला लागलेले असतात. मांड्या कातरल्यामुळे चालण्याचा वेग मंदावलेला असतो. मान वर करून बघायची ताकद संपलेली असते. कधी एकदा ही वाट संपते असे वाटायला लागते. मघाची पायवाट संपून रस्ता रुंद होत-होत गाडी रस्ता झालेला असतो. तास-दीड तास सपाटीवरच्या वाटचालीनंतर आंबा नदीच्या पात्रातील एका खडकावर उभारलेलं स्मारक नजरेस पडतं आणि सगळे श्रम विसरून आपण त्या स्मारकाकडे धाव घेतो.

उंबरखिंडीच्या युध्दाचे स्मारकशिल्प मोठं देखणं आहे. खाली मोठया चौकोनी दगडी चौथऱ्यावर आणखी एक उभा आयताकृती चौथरा उभारून, त्यावर पुढील बाजूस पंचधातुच्या पत्र्यावर शिवभारतात वर्णील्याप्रमाणे शिवरायांचे शिल्प कोरलेले आहे. डाव्या बाजूस इतिहास, उजवीकडे आज्ञापत्र व मागील बाजूस उद्घाटनाबाबतचा तपशील संगमरवरी पाटीवर शब्दबध्द केलेला आहे. माथ्यावर स्मारकाला साजेशी सूर्यांकीत ढाल, तलवार, भाला, प्रत्यंचा चढवलेले धनुष्य, आणि भगवा ध्वज आदी धातूची शिल्पे उभारली आहेत. उंबरखिंडीच्या समरभूमीवर घडलेल्या प्रसंगाची याद म्हणून या संभाव्य ठिकाणी लोणावळ्याच्या ‘शिवदुर्ग मित्र’ यांनी हे स्मारक खूपच छान कल्पकतेने साकारलेले आहे. पावसाळ्यात अंबा नदीच्या पात्रातील पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड ओढ असते. अश्यावेळी मात्र तिथवर पोहचता येत नाही.

स्मारक पाहून झाले की पुढची वाट धरायची. आंबा नदी जिथे डावीकडे म्हणजे दक्षिणेकडे वळते त्याच्या समोर म्हणजे उजव्या हाती असलेल्या टेकडी पल्याड उंबरे गाव लागते. उंबरे गाव पेण तालुक्यातील हद्दीत येतं. आंबेनळीच्या वाटेनं कोकणात उतरल्यावर पनवेल, कल्याण, वा पाली, नागोठण्याकडं जायचे असो या उंबरखिंडीतूनच जावे लागते. उंबरखिंड हे सह्याद्रीतून उतरण्याच्या घाटाचे नाव नव्हे तर सह्याद्रीतून कोकणात उतरल्यावर पुढे जे उंच सखल अरण्य लागते त्याचे नाव 'उंबरखिंड'. 

परंतु आपण चालत ज्या गाडी रस्त्याला येऊन मिळतो त्या खोपोली-पाली मार्गावर शेमडी गाव लागते. इथून डावीकडे पाली-कोलाड व उजवीकडे खोपोलीला जाता येते. जे कुणी सुधागड, सरसगड किंवा मृगगड पाहून खोपोलीला परतत असतील त्यांनी अर्ध्या-एक तासाची  वेळ काढून पाली-खोपोली मार्गावर असलेल्या शेमडी गावातील एस् टी विनंती थांबा जवळ उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने ३/४ किमी. अंतरावर असलेल्या उंबरखिंडीतील समरभूमीला अवश्य भेट द्यावी. आता इथं पर्यंतचा गाडी रस्ताही बऱ्यापैकी बांधून झालाय. 

पूर्व इतिहास व इतरस्र

अफझलखानाचा वध झाल्यावर त्याच्या बरोबर आलेल्या सेनेचा विध्वंस करून लगोलग शिवरायांनी आदिलशाहाचा कोल्हापूर पर्यंतचा प्रांत ताब्यात घेतला. आदिलशाहीवर एकामागोमाग एक आघात होतच होते. प्रत्येक आघात अनपेक्षित व मर्मस्थानी होता. त्यातच आदिलशाही फौज तंजावरच्या मोहिमेत अडकलेली. तंजावर काबीज झाल्यानंतर तेथील प्रांताची व्यवस्था लावून लष्कराला माघारी फिरे पर्यंत महिनाभराचा कालावधी लागणार होता. आणि इकडे तर शिवराय विजापूरच्या दिशेने मुसंडी मारतच होते. रुस्तुमेजमानच्या पराभवानंतर कवठे, बोरगाव, कुंडल, सांगलीच्याही पुढे जाऊन नेताजी मिरजेला वेढा घालून बसला होता. पाठोपाठ राजेही मिरजेपाशी आले. शत्रू दारात येऊन ठेपला असताना आदिलशाहाला स्वस्थ बसणे शक्य नव्हते. आदिलशाहाने दिल्लीच्या औरंगजेब बादशाहाला काकुळतीचा अर्ज पाठवला, "आपल्या दरबारातील कुणी तरी मातब्बर सरदार लवकरात लवकर शिवाजीचा बिमोड करण्यासाठी दक्षिणेत पाठवावा." दरम्यान आदिलशाहाच्या सुदैवाने एक सरदार पुढे आला. त्याचे नाव सिद्दी जौहर.

सिद्दी जौहर हा तेलंगणातील किल्ले मुहम्मदनूर ऊर्फ कर्नुळ येथील आदिलशाही सरदार. जौहर या शब्दाचा अर्थ  रत्न. हा मोठा शूर, अनुभवी, धाडसी, कर्तबगार व जिद्दी सरदार असला तरी आदिलशाहाशी पूर्णपणे एकनिष्ठ नव्हता. त्याच्या नावावर काही बंडखोरी जमा होती. यामुळे बादशहाने त्याला आपल्यापासून दूर ठेवले होते. त्याने आपला अर्ज आदिलशाही दरबाराला पेश केला. "मी पूर्वी वाईट कृत्ये केलीत. त्याबद्दल मला पश्च्याताप होत आहे. बादशहाने माझे सर्व गुन्हे माफ करावे. बादशाह मला माफीचे फर्मान धाडतील तर मी बादशाहांचे भेटीस येईन आणि जी कामगिरी सांगतील ती मी आनंदाने स्वीकारून शत्रूचा निःपात करीन." आदिलशाही दरबार चिंतेत असताना जौहरचा माफीचा अर्ज आल्याने आदिलशाहाची चिंता दूर झाली असली तरी त्याने तसे भासवले नाही. उलट संकट मामुली आहे. आपण सर्व शक्तिमान आहोत आणि जौहरवरच आपण कृपा करीत आहोत असा आव आणून त्याने जौहरला उत्तर पाठवले. "आमच्या खिदमतीस आपल्यासारखे अनेक शूर सरदार आहेत व ते आपल्या सारखी कामे करण्याची इच्छा मनी धरून आहेत. परंतु तुम्ही स्वतः होऊन या चाकरीसाठी अर्ज केलात. तेंव्हा तुम्हास हुकूम करण्यात येत आहे की शिवाजी वरची मोहीम फत्ते करून दाखवावी व बादशाही मेहेरबानीस पात्र व्हावे’’. आदिलशाहाने सिद्दी जौहरला ‘सलाबतखान' किताब व खिलत देऊन शिवरायांवरची कामगिरी सोपवली.

सिद्दी जौहर वेळ न दौडवता आपल्या सोबत इतर सरदारांसह ४०-४५ हजाराची फौज घेऊन जानेवारी १६६० दरम्यान स्वराज्यावर चालून आला. याच वेळी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी घडली, ती म्हणजे औरंगजेबाच्या आज्ञेवरून शाहिस्तेखान  दि. २८ जानेवारी १६६० रोजी औरंगाबादहून निघाला. ही गोष्ट हेरांकरवी महाराजांस समजली होती. हे दुहेरी संकट स्वराज्यात घुसून प्रदेशाची नासाडी होऊ नये म्हणून व सिद्दी जौहरच्या सैन्याची तयारी पाहून शिवरायांनी मिरजेचा वेढा उठविला आणि जौहरचे सैन्य स्वराज्याच्या सीमेवर रोखण्यासाठी स्वतः दि. २ मार्च १६६० रोजी पन्हाळगडावर आश्रय घेतला. शिवरायांनी सलोख्याची भाषा वापरून सिद्दी जौहरला झुलवत ठेवले व दि. १२ जुलै १६६० रोजी पन्हाळगडाहून विशाळगडाकडे यशस्वी पलायन केले. आणि राजगडी सुखरूप पोहोचले. आता राहता राहिला शाहिस्तेखान.

मुघल साम्राज्याच्या घराण्याची सुरुवात बाबरपासून झाली. बाबर हा तैमूरलंगाच्या तुर्की घराण्यातला. त्याचे वडील उमरशेख मिर्झा हे तुर्की नि आई कुतलख खातुम ही मोगल चंगीजखानाच्या वंशातली. बाबरचं खरं नाव जलालुद्दीन. 'बाबर' ही त्याची पदवी. बाबर म्हणजे 'सिंह'. बाबरचा मुलगा हुमायून. त्याचं खरं नाव नसिरुद्दीन, 'हुमायून' ही त्याची पदवी. हुमायून म्हणजे 'भाग्यवान'. हुमायूनचा मुलगा अकबर. त्याचं खरं नाव जलालुद्दीन, 'अकबर' ही त्याची पदवी. अकबर म्हणजे 'श्रेष्ठ'. अकबराचा मुलगा जहांगीर उर्फ सलिम. त्याचं खरं नाव नुरुद्दीन. 'जहांगीर' आणि 'सलिम' या त्याच्या दोन पदव्या. जहांगीर म्हणजे 'जग जिंकणारा' व सलिम म्हणजे 'कोमल अंतःकरणाचा'. जहांगीरचा मुलगा शहाजहान. त्याचं खरं नाव शहाबुद्दीन, 'शहाजहान' ही त्याची पदवी. शहाजहान म्हणजे 'जगाचा अधिपती'. शहाजहानचा मुलगा औरंगजेब. त्याचं खरं नाव मुहीमुद्दीन महंमद.'औरंगजेब' आणि 'आलमगीर' या त्याच्या दोन पदव्या. औरंगजेब म्हणजे 'सिंहासन सुशोभित करणारा' आणि आलमगीर म्हणजे 'जगाचा स्वामी'. असा हा औरंगजेब वारसा युद्ध जिंकण्यासाठी सन १६५८ मध्ये घाईघाईने उत्तरेत पोहोचला व जून १६५९ मध्ये दिल्लीच्या गादीवर बसला. त्यामुळे त्याचे दक्षिणेतील कार्य अपुरेच राहिले होते. आदिलशहाने केलेल्या आर्त विनवणीनुसार दिल्लीहून औरंगजेबाने औरंगाबादला असलेला अनुभवी, कर्तबगार व विश्वासू मोगली सुभेदार शाहिस्तेखान याला शिवाजीवर चालून जाण्याचा हुकूम दिला.

अकबराचा मुख्य वजीर इनमाद्दौला याचा मुलगा अबुल हसन याला जहांगीराने 'असफखान' किताब दिला होता. असफखान हा जहांगीर व शहाजहान यांचा मुख्य वजीर होता. असफखानाची बहीण नूरजहाँ ही जहांगीर बादशाहाची पत्नी. या असफखानाचा मुलगा शाहिस्तेखान. असफखानाच्या मृत्यूनंतर सन १६४१ मध्ये शहाजहानने शाहिस्तेखानास मुख्य वजीर नेमले. शहाजहानची पत्नी मुमताजमहल ही शाहिस्तेखानाची बहीण. तिचा मुलगा औरंगजेब. या नात्याने शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा लागत होता. मुमताजमहलच्या ज्या चार बहिणी होत्या त्या मोठ्या सरदारांना दिल्या होत्या. त्यातील एक होता माळव्याचा सुभेदार जाफरबेग. जाफरबेगला नामदारखान व कामदारखान असे दोन मुलगे होते. कामदारखानाची बायको परीबेगम ही शाहिस्तेखानाची मुलगी असून त्यांचे लग्न पुण्याच्या लालमहालातच झाले होते. शाहिस्तेखान याचे खरे नाव अबू तालीब ऊर्फ मिर्झा मुराद. जहांगीरच्या कारकिर्दीत याला 'शाहिस्तेखान' हा किताब मिळाला आणि पुढे इतिहासात तोच रूढ झाला. शाहिस्तेखान या शब्दाचा अर्थ 'सुसंस्कृत'. शहाजहानच्या कारकिर्दीत याला 'खान-इ-जहान' हा किताब मिळाला. १६५८ मध्ये सामूगढची लढाई जिंकल्यानंतर औरंगजेबाने याला 'अमीरूल उमरा' म्हणजे अमीरांचा अमीर हा किताब दिला. याला 'खान सआदत निशान' व 'नबाब बहादूर' असे ही किताब होते. बादशाही घराण्याशी व अनेक दरबारी सरदारांशी याचे नातेसंबंध असल्यामुळे दरबारात त्याचे चांगलेच वजन होते. शहाजहानच्या नको त्या उद्योगापायी शाहिस्तेखानाच्या एका बेगमेने आत्महत्या केली. त्यामुळे रागावून जाऊन शाहिस्तेखानाने औरंगजेबाचा पक्ष धरला. इतकेच नव्हे तर दाराला ठार मारावे असा सल्ला देणारा व औरंगजेबाला गादी मिळवून देण्यात शाहिस्तेखानाचा मोठा वाटा होता. त्यामुळे शाहिस्तेखान औरंगजेबाच्या खास मर्जीतील बनला होता.

असा हा शाहिस्तेखान २८ जानेवारी १६६० रोजी औरंगाबादहुन निघून ९ मे १६६० रोजी पुण्यात पोहोचला आणि त्याने लालमहालातच डेरा टाकला. पुण्यात आल्यानंतर स्वराज्यातील पहिला किल्ला जिंकण्यासाठी त्याने पुण्याच्या उत्तरेस असलेल्या छोट्याश्या चाकणच्या किल्ल्याची निवड केली. दि. २१ जून १६६० रोजी तो चाकणला पोहोचला. शाहिस्तेखान स्वतः या युद्धाचे नेतृत्व करीत होता. त्याच्यापाशी फौज होती वीस हजार. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आपल्या ६००/७०० कडव्या मराठा फौजेनिशी चाकणची छोटीशी गढी झुंजवीत होता. ५५ दिवस खर्ची घालून अखेर दि. १५ ऑगस्ट १६६० रोजी चाकणचा संग्रामदुर्ग शाहिस्तेखानाच्या ताब्यात आला. हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शाहिस्तेखान चाकणला आराम करून ऑक्टोबरमध्ये पुण्याला परत आला. चाकणसारख्या छोट्या भुईकोट किल्ल्यासाठी पंचावन्न दिवस झगडावे लागले तर मग इतर डोंगरी किल्ल्यांना किती दिवस लागतील. असा विचार करून शाहिस्तेखान त्यानंतर मराठ्यांच्या किल्ल्यांच्या वाटेला गेलाच नाही. त्याने आपले लक्ष शिवरायांचा मुलूख काबीज करण्यावर केंद्रित केले. त्याची सैनिकी हालचाल प्रचंड धीमी गतीची होती. त्याच्या या सुस्तपणास कंटाळलेला जाफरबेगचा मुलगा नामदारखान यानं खानास विचारलं' नबाबसाहेब आपल्यापाशी एवढं सैन्यबळ असताना शिवाजीस जिंकण्यासाठी इतका वेळ का लागावा? तुम्ही मला आज्ञा द्या, मी शिवाजीस पकडून आणतो.' यावर खानानं उत्तर दिलं, 'तू हे तुझ्या जवानीच्या जोशात बोलतो आहेस. आपण शिवाजीला संपवलं तर दक्खनमध्ये औरंगजेबास दुसरा कोणी शत्रू रहाणार नाही. ही मोहीम संपविली तर औरंगजेब आपली रवानगी कंधारच्या सीमेवर करील आणि कंधारची मोहीम यापेक्षाही आपणास त्रासदायक नि दगदगीची ठरेल. त्यापेक्षा पूणं काय वाईट आहे? जो पर्यंत शिवाजी आहे, तो पर्यंत आपण आपली मोहीम लांबणीवर टाकू आणि आपण औरंगजेबास करतो आहोत, जिंकतो आहोत असे पत्राने कळवत राहू’. यावर नामदारखान काय बोलणार कपाळ!

जरी खानाची मोहीम धिम्या गतीने चालत असली तरी तो शिवरायांचे एकेक मुलुख काबीज करतच होता आणि राजांची माणसं आमिषे दाखवून फोडत होता. कृष्णाजी काळभोर, बाबाजी होनप, माहूली किल्ल्याचे सबनीस नारोजी पंडित ही मंडळी वतनाच्या लोभाने खानाकडे गेलीत. इतकेच काय तर प्रतापगड युध्दी महाराजांचा अंगरक्षक असलेला संभाजी कावजी (आडनाव कोंढाळकर) हाbही खानाकडे गेला. आपल्या शरीरसामर्थ्यचं दांडगं प्रदर्शन करण्यासाठी त्याने जवळच उभा असलेला घोडा चहूपायी धरून उचलला. त्याच्या या प्रात्यक्षिकावर प्रसन्न होऊन शाहिस्तेखानाने त्यास मनसबदारी बहाल करून पाचशे स्वारांनिशी तैनातीत ठेवला व मौजे मलकर येथे ठाणेदार नेमले. चाकणचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर शाहिस्तेखानाने संभाजी कावजीला किल्ल्याचा हवालदार नेमले. आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी तहात दिलेले किल्ले परत घेण्याचा सपाटा लावला. चाकणचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी प्रतापराव गुजर यांच्यावर सोपविण्यात आली. प्रतापरावांनी संभाजी कावजीला दिलेल्या आव्हानानुसार झालेल्या द्वंद युद्धात संभाजी कावजी प्रतापरावांकडून मारला गेला. दि. १३ मे १६६१.

कोकणचा भाग राजांना रसद, साधनसामुग्री, आरमार उभारणी व वेळप्रसंगी आश्रय अशा दृष्टीने महत्त्वाचा होता त्यामुळे हळूहळू हा भाग सुद्धा काबीज करावा असे खानाने ठरवले. कोकणचा मुलुख ताब्यात आला तर शिवरायांच्या बलस्थानावर आघात होईल हे ओळखून त्याने सर्वप्रथम कोकण मोहीम काढण्याचा इरादा पक्का केला. त्यासाठी शाहिस्तेखानाने कारतलबखानाची निवड केली. कारतलबखान हा  ४००० स्वारांचा  मनसबदार होता आणि त्याने परंडाचा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. कारतलब हा उजबेग म्हणजे तुर्क नव्हे तर मध्य आशियातील. कवींद्र परमानंद म्हणतात कारतलबखानाचा बाप हा अजबड म्हणजे धनगर मराठा वंशातील होता. त्याचे नाव जसवंतराव. त्याने पुढे इस्लाम ग्रहण केला. जहांगिराच्या नोकरीत असताना त्याला 'कारतलब' हा किताब देण्यात आला होता. कारतलब या शब्दाचा अर्थ 'कामात शूर किंवा बहादूर असलेला'. पुढे हाच किताब त्याच्या मुलानेही धारण केल्यामुळे लोकही त्याला याच नावाने ओळखू लागले.

कारतलबखानाची कोकण मोहिम व मार्ग

कारतलबखानाने मोहिमेसाठी जय्यत तयारी सुरू केली. पायदळ, घोडदळ असे वीस हजाराचे सैन्य. शिवाय घोडे, बैल, डेरे, बंदुका, छोट्या तोफा, खजिना इ. प्रचंड सामुग्रीसह त्याच्या सैन्यात अमरसिंह, मित्रसेन, कछप, चौहान, सर्जेराव गाढे, जसवंतराव कोकाटे, जाधवराव या सारखे शूर सरदार होते. शिवाय सोबत माहूरची रायबागनही होती.

रायबागन ही ब्राह्मण स्त्री. हिचे नाव मूळ नाव सावित्रीबाई. माहूरचा किल्ला म्हणजेच ‘रामगड’. या किल्ल्याचा अखेरचा तट यादव राजा रामदेवाने बांधला. त्यावरुन याला रामगड हे नाव पडले. माहूरचा किल्ला चौदाव्या शतकात गोंड राजांनी जिंकला. त्यानंतर इमादशाही व निजामशाहीकडे हा किल्ला गेला. १७ व्या शतकात निजामशाही संपल्यानंतर सन १५९५ मध्ये जेव्हा अकबराने माहूर किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा तेथे इंद्रजीव नावाचा राजपूत जमीनदार होता. अकबराने त्याच्याकडून किल्लेदारी तसेच जहागीर काढून ती राजे उदाराम यांना दिली. त्याच्या वडिलांचे नाव रामचंद्र किंवा रामाजी. उदाजीराम याला पाच हजारी जात/५००० स्वार अशी मनसब होती. राजेराम उद्धवराव ऊर्फ उदाराम देशमुख हा निजामशाहीत लखूजी जाधवरावांशी निष्ठावान होता. जाधावरावांच्या मृत्यूनंतर तो मोगल चाकरीत गेला व पुढे सन १६३२ साली देशद्रोही म्हणून तो मारला गेला.

त्यावेळी सावित्रीबाई अल्पवयीन होती. त्यामुळे तीचा मुलगा जगजीवनराम हा अल्पवयीन असूनही महाबतखानाने तीन हजारी जात/२००० स्वार अशा मनसबीकरीता त्याची शिफारस केली. त्यानुसार लगेच शहाजहान बादशाहाने १९ नोव्हेंबर १६३४ रोजी जगजीवनराम याला मनसब दिली. जगजीवनराम मोगल सेवेत राहिल्यामुळे याची वर्तणूक मोगली धर्तीची झाली होती. त्यामुळे उदाजीराम याच्या पश्चात त्याची पत्नी सावित्रीबाईने सर्व सूत्रे हातात घेतली. वऱ्हाडातील माहूर, पुसद, वाशीम, मालेगाव, भोजले, वारा व तुळशी या भागाची जहागिरी खंबीरपणे सांभाळली. त्या जहागिरीसाठी सन १६३२ ते ३७ दरम्यान हरचंदराय (हा इंद्रजीवच्या कुळातला असावा) याने माहूरवर आक्रमण केले. यावेळी देशमुखांच्या घरी कोणी कर्ता पुरुष नव्हता. तेव्हा आपल्या भाल्याला चोळी बांधून  ती लढण्यास सज्ज झाली. “तुमच्या बहिणीची लाज राखा ” असे म्हणून तिने सैन्याला उत्तेजीत करून लढण्याचे आवाहन केले. आणि तिने हरचंदरायाचा पराभव केला.

सन १६५८ मध्ये औरंगजेब व दारा यांच्यात आग्र्याजवळ समुगड येथे लढाई झाली. या वारसाहक्काच्या निर्णायक लढाईत औरंगजेबाच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. औरंगजेबाच्या बाजूने सावित्रीबाई व जगजीवनराम लढत असताना जगजीवनराम मारला गेला. आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलाचा मृत्यू झाला असतानाही खचून न जाता सावित्रीबाई प्रामाणिकपणे लढत राहिली. हि गोष्ट औरंगजेबाच्या कानावर गेली. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला. विजय संपादून रीतसर गादीवर बसल्यावर औरंगजेबाने तिच्या कर्तृत्वावर व पराक्रमावर खूष होऊन तिला 'पंडिता' व 'रायबागन' अश्या दोन पदव्या बहाल केल्यात. रायबागन म्हणजे राजांमधील वाघीण - राजव्याघ्री.

जगजीवनराम त्याचा अल्पवयीन मुलगा बाबूराव या नातवाला जहागिरीवर बसवून सावित्रीबाई औरंगजेब दरबारी रुजू झाली. स्वतः कारभार पाहात असताना मोगली मोहिमांत भाग घेऊ लागली. पुढे रायबागनचा नातू बाबुराव हा सालेरीच्या युद्धात मोंगलांकडून लढताना मराठ्यांच्या हाती सापडला. त्यावेळी त्यानं आपली शेंडी, जानवे दाखवून स्वत:ची सुटका करून घेतली. याचा मृत्यू सन १७०० साली झाला.

शाहिस्तेखानाचा निरोप घेऊन जानेवारी १६६१ अखेरीस कारतलबखानाने पूणे सोडले. आता जलद गतीने सह्याद्री उतरून कोकणात उतरायचे व तेथील पाली, नागोठणे, चौल इथला मुलूख मारून उत्तरेकडील पनवेल, कल्याण, भिवंडीकडे सरकण्याचा त्याचा मनसुबा होता. घाटमाथ्यावर येई पर्यंत डोंगराळ व जंगली मुलूख लागतो. तो पार करे पर्यंत सैन्याची पुरती दमछाक होणार होती हे तो जाणून होता. शिवाय कोकणात उतरायचे म्हणजे सह्याद्रीचा कुठला न कुठला तरी घाट उतरणे क्रमप्राप्त होते. कारतलबखानाने कोकणातील ज्या प्रांतात उतरायचे ठरविले होते तिथे पोहोचायचे म्हणजे एकतर मुळशीमार्गे पश्चिमेच्या घाटांनी कुंडलिका नदीच्या खोऱ्यात तरी उतरावे लागणार होते. किंवा पवनेच्या खोऱ्यातून पश्चिमेस जाऊन घाट उतरून पालीस तरी जावे लागणार होते. किंवा लोणावळ्याच्या पश्चिमेच्या घाटांनी खोपाली परिसरात तरी उतरावे लागणार होते. वरील घाटवाटांची भौगोलिकस्थिती जाणून घेण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने आपल्या सल्लागारांच्या सोबत सल्ला-मसलत केली. त्यातून घाटवाटांची त्याच्यासमोर जी माहिती आली ती अशी.

घाटाची निवड

मुळशीहून कोकणात उतरण्यास घाट वाटा आहेत दोन. पैकी एक मुळशी, दावडी, सरोळा घाट उतरून भिरा, पाटणूस मार्गे रोहा असा सरोळा घाट. व दुसरा मुळशी, ताम्हणी बुद्रुक, ताम्हणी घाट उतरून रोहा असा ताम्हणी घाट.

किंवा पवनेच्या खोऱ्यातून पश्चिमेस जाऊन कोकणात उतरण्यास घाट वाटा आहेत तीन. पैकी पहिला तुंगवाडी, जांभुळणे, नांदगाव, मलुष्टे, सवघाट उतरून परळी मार्गे जांभुळपाडा असा सवघाट.  दुसरा अंबवणे (कोरीगड), तेलबैला, वाघजाई घाट उतरून ठाणाळे मार्गे पाली असा वाघजाई घाट. आणि तिसरा अंबवणे (कोरीगड) तेलबैला, सवाष्णी घाट उतरून सुधागड मार्गे पाली असा सवाष्णी घाट.

आणि लोणावळ्यातून कोकणात उतरण्यास  दोन घाट वाटा आहेत. पैकी एक लोणावळा, खंडाळा उतरून खोपोली असा बोरघाट व दुसरा लोणावळा, कुरवंडा घाट उतरून अंबा नदीचे खोरे, उंबरे मार्गे पेण असा कुरवंडा घाट.

ठरल्याप्रमाणे पाली नागोठणे चौलला जायचे तर मुळशीमार्गे उतरणारे दोन्ही घाट फार लांबचे, सैन्याच्या हालचालींना अतिशय अवघड व अडचणीचे. तसेच पवनेच्या खोऱ्याच्या पश्चिमेचे तीनही घाट असेच अवघड, वेळकाढू उताराचे केवळ हलक्या पायदळाच्या उपयोगाचे. घाटमाथ्यावर येई पर्यंत डोंगराळ व जंगली मुलूख लागतो की सैन्याची पुरी दमछाक होणार होती हे तो जाणून होता. कारतलबखानाकडे सैन्य व त्याला लागणारा सरंजाम खूप होता त्यामुळे त्याला सोप्पा, कमी उताराचा घाट हवा होता. त्या काळी त्या भागातील वाहतुकीस जवळचा घाट म्हणजे बोरघाट किंवा कुरवंडा घाट. बोरघाट थोडा अवघड त्यामानाने कुरवंडा घाट थोडा सोप्पा व वाहतुकीला प्रचलित होता. म्हणून खानाची स्वारी त्या रोखाने निघाली व लोणावळ्याजवळ पोहोचली. खानाने आपल्या स्वारीचा मार्ग अत्यंत गुप्त ठेवला होता. खानाने आपल्या सैन्याची चाल अशी ठेवली होती की तो बोरघाटाने उतरणार आहे अशी कल्पना व्हावी. त्याला कुरवंडे घाटानेच फार कमी वेळात पाली, पेण, नागोठणे या प्रांतात उतरायचे होते.

महाराजांच्या मोहिमेची सिद्धता व डावपेच

कारतलबखान वीस हजार स्वार घेवून उत्तर कोकणच्या माहिमेवर निघणार आहे. इथं पासून ते तो निघाला आहे, इथं पर्यंतची टाकोटाक खबर राजांना त्यांचे चाणाक्ष हेरखाते राजगडावर कळवत होते. खानाचे सैन्य प्रवास करीत असताना सैन्याच्या नकळत आसपास फिरून त्याच्या हालचालींची इतंभूत माहिती गोळा करीत राजांपर्यंत पोहोचवत होते. खानाची कोकण मोहीम निश्चित असल्यामुळे खानाच्या प्रतिकारासाठी राजगडावरही खडी फौज तयार झाली. ठिकठिकाणच्या सैन्याच्या तुकड्यांना सावधतेचे हुकूम जाऊ लागले. कारतलबखान पुण्याहून निघून तळेगाव, वडगाव वरून मळवलीला सरकला. आपली मोहीम गुप्त राहावी यासाठी त्याने मार्गातील भागास फारसा उपद्रव दिला नाही. आता त्याने लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तुंगारण्यात जाण्यास प्रारंभ केला. हा मार्ग पूर्णपणे डोंगरी, विलक्षण रुंद व अफाट अरण्याचा होता. तरी देखील कारतलबखानाचे सैन्य नेटाने पुढे सरकत होते. लोहगड विसापूरवरील मराठा सैन्याला राजांकरवी हेरांकडून खानाच्या सैन्याला कोणताही अटकाव करू नये असा आधीच आदेश मिळाला होता त्यामुळे या भागातून खानाला विरोध झाला नाही. खानाचा आत्मविश्वास वाढला. खानाच्या सैन्याने निर्विघ्नपणे तुंगारण्य ओलांडले आणि खान लोणावळ्याला आला.

खानाचा सुरुवातीचा प्रवास बोरघाटाच्या दिशेने असल्यामुळे राजांनी कोकणच्या रक्षणासाठी व प्रतिकारासाठी आपल्या सैन्याच्या लहानलहान तुकड्या ज्या पेण, पाली, नागोठणे, रेवदंडा या भागात विखुरलेल्या होत्या त्याची जमवाजमव  सुरू केली व पुढील आदेश मिळेपर्यंत सज्ज राहावे अशी ताकीद दिली. हे करीत असताना मराठा सैन्य एकत्र येवून पेणच्या बाजूस जमलेले आहे अशी  हूल उठवून ती बातमी खानापर्यंत जाईल याची व्यवस्थाही केली. खान बोरघाटाने कोकणात उतरणार आहे अशी हेरांकरवी राजांना मिळालेली खबर पक्की होती. पण वाटेत खानाच्या सल्लागारांनी खानाला सल्ला दिला कि पुढील बोरघाटाच्या मार्गाने न जाता शत्रूच्या सैन्याला बातमी लागण्याच्या आत आपले सैन्य जवळच्या कुरवंडा घाटाने कोकणात उतरवावे व शत्रूच्या सैन्यावर अचानक हल्ला करून कोकण प्रांत हाती घ्यावा. हा सल्ला खानाला पटल्यामुळे त्याने आपला मार्ग लोणावळ्याच्या अलीकडे अचानक बदलला. खान लोणावळ्याकडे न जाता दक्षिणेला कुरवंडा घाटकडे सरकला. ही खबर राजांकडे गेली आणि आपल्याला चकवू पहाणाऱ्या खानाला कुठेतरी अवघड जागी गाठून त्याला त्याच्या सैन्यासह कसे मारून काढता येईल याचाच राजे विचार करू लागले आणि ते ससैन्य राजगडावरून निघाले.

खान सैन्यासह दि.१ फेब्रुवारी १६६१ ला लोणावळ्यातील कुरवंडा गावाजवळ पोहोचला. या भागात मोठी सपाटी असल्याने इथे रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरविले. पश्चिम व दक्षिणेला असलेले दाट जंगल व डोंगराळ भागात चहूबाजूंनी खानाची टेहळणीची पथके दूरदूरवर शत्रूचा मागोवा घेत फिरत होती. त्यांनी हा व आसपासचा प्रांत निर्धोक असून शत्रूचे (राजांचे) सैन्य आसपास कुठेच नाही याची खानाला खात्री दिली. याशिवाय घाटाखाली पेणजवळ राजांचे सैन्य जमत असल्याचीही बातमी दिली. इथे भय नाही हे पाहून १ तारखेच्या रात्री कुरवंड्याच्या पठारावर खानाने सावधपणे मुक्काम केला. टेहेळ्यांना रात्रभरात कुठेच धोका दिसला नव्हता म्हणून पहाटे पहाटे कुरवंडा घाटाकडे प्रस्थान केले.

व्यूहरचना

दरम्यान ३१ जानेवारी १६६१ ला नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे यांच्यासह आपले निवडक घोडेस्वार घेऊन राजांनी राजगड सोडला. सिंहगडाला बगल घेवून ते मुळशी खोऱ्यातून धनगड जवळून वाघजई घाट उतरले. हा मार्ग खानाच्या मार्गाच्या विरुद्ध बाजूस असल्याने खानास त्याचा सुगावा लागला नाही. खान कुरवंडा घाट मार्गाने कोकणात उतरणार याची नक्की खात्री झाल्यावर राजांच्या हालचालींना वेग आला. ठाणाळे, जांभुळपाडा, परळी या मार्गाने ते उंबरखिंडीच्या खालच्या अंगाशी पोहोचले. १ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत त्यांनी खानाला कुठे अडवून हल्ला करायचा याचा पक्का अंदाज बांधला. त्याप्रमाणे आपले सर्व सैन्य चावनीच्या आसपासच्या टेपाडांवर, उंबरखिंडीतील घाटातील अंबा नदी पात्राच्या दोन्ही बाजूस उभ्या असलेल्या डोंगरावरील गर्द झाडीत, घाट उतरणाऱ्या खानाच्या सैन्याच्या नजरेत पडणार नाही अश्या पद्धतीने गटागटाने योग्य त्या सूचना देऊन  उभे करून ठेवलेत व स्वतः राजे नेताजीसह काही सैन्य घेऊन उंबरखिंडीच्या मार्गाच्या तोंडावरील उंबरे गावाच्या जवळच्या टेकडीवर सज्ज झाले. त्याच दिवशी राजांच्या सैन्याची आणखी एक तुकडी घाट न उतरता कोरीगड मार्गे आंबवण्याच्या उत्तरेला येऊन कुरवंडा घाटाच्या दक्षिणेकडील घनदाट जंगलात येऊन राहिली होती. या तुकडीला अत्यंत महत्त्वाची सूचना होती की, त्यांनी खानाचे सैन्य कुरवंडा घाट पूर्णपणे उतरले, की मागून येऊन घाटाचे वरचे तोंड रोखून धरणे. खानाचे सैन्य जसजसे चावनीकडे खाली सरकेल तसतसा घाट वरून आवळणे. हे काम मोठया जिकरीचे होते. शिवरायांच्या सर्व सैन्याकडे तलवारी, भाले, बंदुका ही शस्त्रास्त्रे होतीच पण त्याशिवाय धनुष्यबाण व गोफणीसाठी लागणारे मुबलक दगड-गोटे यांचा भरणा अधिक होता. राजांच्या सैन्याची सर्व सज्जता झाली. आता ते खान कुरवंडा घाट खाली कधी उतरतो याची वाट पाहू लागले.

खानाच्या सैन्याचा मार्ग

शनिवार, दि. २ फेब्रुवारी १६६१ पहाटेच आवराआवर करून खानाच्या सैन्याने तळ हालवला. थोडा चढ चढून सैन्य कुरवंडा घाटाच्या उतरणीला लागले. कुरवंडा घाटातून कोकणात उतरणाऱ्या ज्या दोन वाटा आहेत पैकी डावीकडील मळलेली आंबेनळीची वाट व उजवीकडील तीव्र उतार असलेली भोवणी डोंगरावरून उतरणारी वाट, त्यामुळे कारतलबखानाने आंबेनळीच्या वाटेला नक्की प्रथम पसंती दिली असावी. घोडे, बैल, तोफा आणि खजिना असा सारा सरंजाम घेऊन खानाचे बरेचसे सैन्य आंबेनळीच्या वाटेने तर काही भोवणी डोंगरकण्यावरून उतरण्यास सुरुवात केली. आंबेनळीचा घाट घोडदळ व पायदळ यांना उतरणे कठीण नव्हते. परंतु मोगली रिवाजानुसार खानाचा जो मोठा लवाजमा व अवजड पेटारे, डेरे होते ते सांभाळत उतरवताना हशमांच्या नाकीनऊ येत होते. सारे सैन्य सतराशे फूट उंचीवरून दोन मैलाचा घाट कसा-बसा उतरताना थकून भागून गेलेत. त्यांनी आडव्या आलेल्या अंबा नदीच्या छोट्याशा पात्राला ओलांडून तिच्या काठावर असलेल्या थोड्या सपाटीवर डेरा टाकला. दुपारी साधारण ११-११:३० वाजण्याच्या सुमारापर्यंत खानाचे सर्वच सैन्य खिंड उतरून चावनी पर्यंत पोहोचले. ही पश्चिम बाजू असल्यामुळे सूर्य थोडा वर चढला असला तरी फारसे ऊन लागत नव्हते.

ही जागा खिंडीसारखी असल्यामुळे इथे एकाच ठिकाणी सपाटी  नाही. चावनीपाशी थोडी सपाटी व मुक्कामाला जागा आहे.  त्यामुळे अंबा नदीच्या विस्तृत पात्राच्या काठावर खानाच्या सैन्याचे तंबू दाटीवाटीने पसरले. कारतलबखानाचे सैन्य इथे थांबले म्हणून या टेपाला आता 'चावनी' म्हणून ओळखले जाते. चावनी हा 'छावणी' शब्दाचा अपभ्रंश. अल्पकाळ थांबून खानाने आज्ञा करताच सैन्याने आपला गाशा गुंडाळून ते पुढे निघाले. कारतलबखान व रायबागन चावनीपाशी पिछाडीलाच होते. आता मुख्य प्रवास उंबरखिंडीतील मार्गातला होता. पुढे वाहत जाणार्‍या अंबा नदीच्या डाव्या वळणापाशी उजव्या हाती  मुळची वाट सोडून एक वाट समोरचा चढाव चढून अर्धापाऊण मैलावर असलेल्या उंबरे गावी जाते. या गावामुळे या भागाला 'उंबरखिंड' हे नाव पडले. वास्तविक पाहता आपल्याला माहीत असलेल्या किंवा आपण ज्याला खिंड समजतो तशी इथं खिंड नाही. तर चावनी व उंबरे या गावांमधून वाहत जाणार्‍या अंबा नदीच्या पात्रामुळे जे खोरे निर्माण झाले आहे. तिचा उभा छेद घेतल्यास तो साधारण खिंडी सारखा दिसेल या अर्थाने या भागाला उंबरखिंड म्हणतात.

उंबरखिंडीतील कोंडी व आक्रमक युद्ध पद्धती (Umberkhind Battle)

अंबा नदीच्या काठाने चावणी सोडून कारतलबखानाचे सर्व सैन्य उंबरखिंडीत शिरले. मैलभराची ही खिंड सैनिकांच्या गजबजीने भरून गेली. सैन्य मार्गस्थ होवूनही खान व रायबागन चावनीच्या जवळच होते एव्हाना उन्हाचा ताप जाणवू लागला. खिंडीमुळे हवेचा जोर कमी, दमटपणा जास्त, भागात झाडी कमी, अंबा नदीचे पात्र आटल्यामुळे निर्माण झालेला रखरखाट त्यामुळे सैन्य घामाघूम झाले. मानवर करून बघायचेही कुणामध्ये  त्राण न उरल्यामुळे सगळे सैन्य निमूटपणे माना खाली घालून चालत होते. माणसांच्या आणि जनावरांच्या घश्याला कोरड पडली. पात्र आटून कुठे तरी तयार झालेलं एखाद डबके सोडलं तर सर्व मार्गात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. सर्व सैन्य दमलेल्या अवस्थेत चालत होते. हा मार्ग कधी एकदाचा संपतो आणि आपण केव्हा एकदा उंबऱ्याला पोहोचतो असे सर्वांना झाले होते. खानाची आघाडीची तुकडी वाकणापाशी पोहोचली. इतक्यात ...........

कर्णा वाजला. इशारतीचा खुण झाली. त्याबरोबर एकाएकी चारही दिशांनी मोठमोठ्याने कर्णे वाजू लागले. खानाचे सैन्य थबकले. थांबले. पुढे न सरकता कान टवकारून चारही दिशांना भेदरलेल्या नजरेने पाहू लागले. हे अचानक काय झाले ? हा आवाज कसला ? काही क्षणात 'हर हर महादेव 'ची ललकारी आसमंतात घुमली आणि तत्क्षणी ध्यानी, मनी, स्वप्नी नसताना चारही बाजूंनी मराठा सैन्यांनी गोफण गुंडा, बाण, बंदुकांचा माऱ्यांनी खानाच्या सैन्यावर झडप घातली. प्रचंड मारा सुरू झाला. उंबरखिंडीचा परिसर आरोळ्या, किंकाळ्या आणि रणगर्जना यांनी निनादून गेला. वाकणच्या पुढच्या टेकडीवरून स्वतः राजांच्या तुकडीने खानाच्या आघाडीच्या तुकडीचा मार्ग  रोखला होता. आघाडीची तुकडी पुढे सरकत नसल्यामुळे खानाचे हजारो सैनिक अंबा नदीच्या कोरड्या पात्रात नुसते उभे राहून मार खात होते तर कुणी मार चुकवत होते. काही जण मार चुकविण्यासाठी एकमेकांच्या मागे लपत होते. पण लपणार तरी कसे आणि कोठे. गोफण गुंडा, बाण, बंदुकांचा मारा चारही बाजूने अविश्रांत सुरू होता. मराठे नेमका कुठून मारा करीत आहेत तेच दिसतही नव्हते आणि कळतही नव्हते. शिवाय मराठ्यांची फौज नेमकी किती आहे याचा अंदाजही मोगलांना घेता येईना. कारतलब व रायबागन त्यामानाने सुरक्षित जागी होते. कारतलबखानाला ही गोष्ट समजली. त्याने आपल्या सैन्याला लढण्याची आज्ञा केली परंतु लढणार कुणा बरोबर समोर तर कुणीच दिसत नव्हते. तुंगारण्याचा आधिपती मित्रसेन व अमरसिंह चंदावत या सरदारांनी धाडस करून सैन्याला ओरडून चेतना आणण्याचा प्रयत्न केला व मोठ्या धीराने युद्ध आरंभले. परंतु त्यांचीही तीच अवस्था झाली. हे युद्ध म्हणजे अदृश्य शत्रू विरुद्धचेच युद्ध होते. मारा करताना मराठ्यांचा एखाद दुसरा मावळा दिसला किंवा त्याची लपण्याची जागा दिसली, की तेवढ्यापुरता मारा करता येई. पुन्हा जैसे थे.....

मराठ्यांनी सह्याद्रीच्या भौगोलिक स्थितीचा पुरेपूर फायदा उचलला होता आणि या नैसर्गिक चक्रव्यूहात मोगल पुरते अडकले होते. आता राजांनी नेताजीला पुढे जाऊन खानाचे सर्व मार्ग अडवण्याची आज्ञा केली. कुरवंडा घाटही वरच्या बाजूने बंद झाला होता. खानाच्या काही सैनिकांनी जीव वाचविण्यासाठी मागे निघून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु घाट वाट अडविलेल्या मराठा सैन्याने गोफणगुंड्याने त्यांची डोकी फोडून रक्तबंबाळ करून परत पाठवून दिले. तेव्हा खानाच्या लक्षात आले की परतीचा मार्ग ही रोखण्यात आलेला आहे.

कोंडी, प्रचंड कोंडी ...... शिवभारतकार कवींद्र परमानंद म्हणतात, ‘’एकपद्या तया यान्ती नलिकायंत्रतुल्या l अभूदतीव स्ठगिता वाहिनी सा पदे पदे ll’’ शिवभारतकारांनी या वाटेला “नलिकायंत्राची” उपमा दिलेली आहे. नळीच्या पुढील तोंडावाटे शत्रूस आत येवू दिले आणि नंतर नळीची दोन्ही तोंडे बुच लावून बंद केली.

आता खानाला प्रत्येक गोष्ट समजत होती पण उमजत नव्हती. तो कुणाचेही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मराठ्यांनी ओरडून खानाच्या सैन्याला शरण येण्याचे आवाहन केले. पण कारतलबखानाने ते धुडकावून लावले. त्याचा युद्ध आवेश नष्ट होत नव्हता. त्यामुळे मराठ्यांनी मारा तीव्र आणि तिखट केला. त्यात मोगली सैन्याचे अतोनात नुकसान होऊ लागले. खानाचे सैन्य हतबल अवस्थेत दगड, बाण आणि गोळ्या खात होते.  मराठ्यांनी जागाच तशा मोक्याच्या शोधून काढल्या होत्या. एव्हाना दुपार झाली होती. टळटळीत ऊन, घशाला पडलेली कोरड, कुठेही निश्चित स्थिर उभं रहायला जागा नाही. सारे सैन्य थकून गेले होते. सगळीकडून रडण्याचे-विव्हळण्याचे आवाज पाहून आता रायबागनला राहवेना. तिला कळून चुकले की आता आपण क्षमा याचना केली नाहीतर खानासकट सर्वांना शिवाजीच्या कैदेत पडण्याचा प्रसंग गुदरला आहे. सभासद आपल्या बखरीत म्हणतो, “रायबागन व सरदार पाच हजार मोगल सैन्य घेवून उंबरखिंडीत आलेत. त्यास मारून चालविले. रायबागीन कोंडली . तिने दाती तृण धरोन लेक रजियांची म्हणून बोलून कौल घेतला. मग तिस कौल देवून अनात करोन सोडली.“  ती खानाजवळ गेली व तिने खानाला शरणागती स्वीकारायचा स्पष्ट सल्ला दिला. त्यांचा अहंकार त्याला शरण येऊ देत नव्हता पण एव्हाना त्याला सर्व परिस्थितीचा अंदाज आला होता. रायबागनचा सल्ला मानून खानाने दूताकरवी शिवरायांच्याकडे दयेचा अर्ज पेश करण्याचे ठरविले.

शरणागती

पांढरे निशाण घेवून कारतलबखानाचा दूत येतो हे राजांना कळले. ते वाकणाजवळील टेकडीवरुन निघून उंबरे गावात आले. दूताला समोर आणण्यात आल्यावर फक्त भुवया उंचावून त्यांनी विचारले “खानाचे म्हणणे काय आहे”, यावर दूताने नम्रपूर्वक खाली मान घालून खानाचा संदेश निवेदन केला. अर्जात खान म्हणतो ...... “आपले तीर्थरूप व खानसाहेबांची दोस्ती. केवळ शाहिस्तेखानाच्या आग्रहापायी मी हे अविचारी कृत्य केले. आता खानसाहेब अभयदान व जीवदानाची याचना करीत आहेत. त्यांना व त्यांच्या सैन्याला जिवंत परत जाऊ द्यावे एवढेच”. दूताकडून खानाचे म्हणणे राजे शांतपणे ऐकत होते. आता निर्णय राजांना घ्यायचा होता आणि समोर दूत दीनवाणा होवून जमिनीकडे पाहत होता.

तसं पहायला गेलं तर शाहिस्तेखान गेले वर्षभर फक्त स्वराज्याचा विध्वंस करीत आला होता. इतर इस्लामी राजे-सरदारांप्रमाणे त्याने कुठेही माणसांची कत्तल केली नव्हती. आणि आता शाहिस्तेखानाने पाठविलेल्या कारतलबखानाचे सैन्य उंबरखिंडीतील अवघड सापळ्यात पूर्णपणे अडकले होते. राजांना खाना बरोबरचा प्रचंड सरंजाम, सामुग्री दिसत होती.  स्वराज्यासाठी याची नितांत आवश्यकता सुद्धा होती. हे सारे काही न करता पदरात पडणार होते. युद्ध चालू ठेवणे म्हणजे फक्त कत्तलच होणार होती. राजांनी मनात आणले असते तर तसे ही घडू शकले असते. पण राजे असंस्कृत, क्रूर नव्हते. पूर्ण शरण आल्यामुळे युद्ध थांबवावे व कारतलबखानाला अभय द्यावे असे राजांनी ठरवले. मात्र एक ‘अट’ घालण्यात आली. “खानासह त्याच्या सर्व सैन्याचा सरंजाम जिथे आहे जसा आहे तो तसाच सोडून तत्काळ परत मागे जावे. हे कबुल असेल तर ठीक अन्यथा युद्ध असेच चालूच राहील. शिवाय त्याच्या सैन्यातील जे आमच्या पदरी चाकरीकरिता येतील त्यांना अटकाव करू नये”.

शिवरायांच्या या अटी दूताने खानाला सांगितल्या. आपल्या सैन्याची पुढे होणारी कत्तल थांबविण्यासाठी राजांच्या अटी मान्य करणे भागच होते. कारतलबखानाने राजांच्या सर्व अटी बिनशर्त मान्य केल्यात. शरणागती... सपशेल शरणागती ........

खानचा दूत शिवरायांच्याकडे गेला. त्याने खानचा शरणागतीचा निरोप राजांना सांगितला. राजांनी हात उंचावताच टेकडीवरून कर्णा वाजवीला गेला. सैन्याला युद्ध थांबवण्याचा आदेश कळाला. काही क्षणात थेट कुरवंडा घाटापर्यंत संकेत पोहोचला व युद्ध थांबले. कुरवंडा घाटावरचे तोंड उघडले. नलिकेच्या एका मार्गाचे 'बूच' उघडले गेले. आता येथील तुकडीचे महत्वाचे काम होते ते म्हणजे घाट चढणार्‍या खानाच्या प्रत्येक सैनिकाची झडती घेणे. ठरल्या अटीप्रमाणे त्यांच्याजवळ काही चीजवस्तू, शस्त्रे नाहीत ना ते तपासणे.

कारतलबखानासह सर्व सैन्य खाली माना घालून घाट चढत होते. वाटेतील चौक्यांवर त्यांची तपासणी होत होती. सोबत आणलेल्या वस्तूंपैकी एकही वस्तू खानाला किंवा त्याच्या फौजेला परत नेता आली नाही. खानाची सर्व फौज कुरवंडा घाट माथ्यावर एकत्र झाली व आली त्याच मार्गाने पुण्याकडे रवाना झाली.

खानाचे सैन्य निघून गेल्यावर राजांचे सैन्य खिंडीत उतरले आणि खानाच्या सैन्याने मागे सोडलेल्या अनेक तलवारी, ढाली, भाले, बंदुका, तोफा इत्यादी शस्त्रे. घोडे, बैल, गाडे, डेरे, तंबू, धान्य आदी वस्तू. रोकड, दागिने इत्यादी सारखा मौल्यवान खजिना गोळा केला. तो पूर्ण दिवस सायंकाळ पर्यंत सार्‍या चीजवस्तू, शस्त्रे असे विविध प्रकारचे सामान जमा करण्यात गेला. आपल्याच काही धूर्त व चतुर मंडळींनी मोगलांच्या अंगावरची वस्त्रेही काढून घेतली. (पुढे हीच वस्त्रे शाहीस्ताखानाच्या छप्याच्या वेळेस कामी आलीत) खानाने आणलेल्या जनावरांच्याच पाठीवर लादून राजांचे सैन्य घाट चढले व राजगडाकडे निघून गेले.

राजांचे वर्णन

या मोहिमेवेळी राजे कसे दिसलेत, याचा उल्लेख करताना कवींद्र परमानंद म्हणतात, “नंतर त्याने नम्रभाव स्वीकारून दुसऱ्याचे मन ओळखणारा दूत शिवाजीकडे पाठविला. मग भालदारांनी तेथे त्याची वर्दी दिल्यावर त्याने मस्तक लववून आजानुबाहू शिवाजी राजाचे दुरून दर्शन घेतलें, तो अतिसुंदर व उंच मानेच्या, रुंद छातीच्या, शिकविलेल्या, सुलक्षणी, धिप्पाड शरीराच्या, महाबलवान, दोन्ही बाजूंस बाणांचे दोन भाते पंखांप्रमाणे असलेल्या, रत्नजडित अलंकार घातलेल्या अशा घोड्यावर-गरुडावर विष्णु बसतो तसा आरूढ होऊन अंगांत कवच घातलेल्या व हातांत धनुष्यबाण व तरवार असणाऱ्या घोडदळाच्या समुदायामध्ये होता; त्याच्या अंगांत अभेद्य कवच होते; त्याच्या मस्तकावर उत्कृष्ट शिरस्त्राण शोभत होते; वैकक्ष हारासारखा प्रचंड ढालीने शोभणारा दुपेटा परिधान केला होता; सोनेरी कमरपट्ट्या पासून लटकणाऱ्या तरवारीच्यायोगें तो शोभत होता; त्याच्या तेजस्वी उजव्या हातांत उंच भाला होता; तो अत्यंत सौम्य असूनही आपल्या तेजाने अत्यंत उग्र दिसत होता; पुढे जाऊन लोकांस दूर सारणाऱ्या भालदारांनी योग्य स्थानीं उभे केलेले अनेक सैनिक त्याचा उत्तम सन्मान करीत होते; तो शंकराहूनहि उग्र, अग्नीपेक्षा अत्यंत असह्य, नैर्ऋतापेक्षांहि अतिशय निर्दय, वायूहूनहि बलवान, कुबेराहूनहि धनाढ्य, इंद्राहूनहि समर्थ, यमाहूनहि क्रूर, वरुणापेक्षांहि नीतिज्ञ, चंद्रापेक्षांहि आल्हाददायक, आणि मदनापेक्षांहि अजिंक्य होता”.

अर्थशास्त्रात युद्धाचे जे तीन प्रकार सांगण्यात आलेले आहेत त्यापैकी हे प्रकाश युद्ध म्हणावे लागेल. (इतर कूटयुद्ध व तुष्णीयुद्ध) शिवरायांनी कारतलबखानाशी उंबरखिंडीत केलेल्या युद्धाचे विचारमंथन केल्यास असे जाणवते की शौर्य, धैर्य, चातुर्य आणि औदार्य असा चतुर्विध गुणांचा समुच्चय शिवरायांच्या ठायी एकवटलेला आढळून येतो.

उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle): लेखन, संकलन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच)

संदर्भ - आधार व आभार:

श्रीशिवभारत ..... कवींद्र परमानंदकृत

श्रीशिवछत्रपति प्रस्तावना आराखडा व साधने ..... त्र्यं. शं. शेजवलकर

श्री राजा शिवछत्रपति (भाग १).... गजानन भा. मेहेंदळे

शककर्ते शिवराय (पूर्वार्ध) ..... विजय देशमुख 

शिवरायांचा आठवावा प्रताप ..... तु. वि. जाधव

चर्चा ..... निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे, तु. वि जाधव.

[सूचना: सदर लेखाचे स्वामित्वहक्क लेखक, संकलन: संजय तळेकर (संजय उवाच), मुंबई. भ्रमणध्वनी क्र. : 98202 38177 यांच्याकडे सुरक्षीत आहेत. ह्या लेखाचे संपूर्ण अधिकार लेखक संजय तळेकर, मुंबई यांच्याकडे असून त्याची नोंदणी Digiprove यांच्याकडे केलेली आहे, ह्या लेखातील कुठलाही मजकुर अथवा छायाचित्रे यांचा वापर लेखकाच्या समंती शिवाय करू नये. ]


छायाचित्रे - संजय तळेकर  

उंबरखिंड - Umbar Khind
उंबरखिंड - Umbar Khind










वरील सर्व छायाचित्रे - संजय तळेकर 
मुखपृष्ठ छायाचित्र: अतुल विजय चव्हाण 

Comments

  1. खूपच महत्वपूर्ण माहिती. 👌🙏 संग्रही बरीच साहित्य संपदा असली तरी तू सोबत असलास की चालती फिरती डिजिटल dairy असल्यासारखे वाटते. एखादा गड कोट / तट बुरुज चर्चेत आला की तू त्यावर सहज काहीतरी बोलून जातोस. तुझ्यासाठी जे सहज असतं ते वरकरणी सहज असल तरी त्यामागे तुझा खूप गाढा अभ्यास असतो हे आम्हाला माहीत असतं. तू कायम गुरुस्थानी आहेस. मस्त लिहिलं आहेस. खरंच फार अभ्यासपूर्ण 👌🚩

    ReplyDelete
  2. अतीशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषेमधील वर्णन वाचतांना आपण स्वतः हे युद्ध पहात असल्याचा भास होतो.

    ReplyDelete
  3. खूपच माहितीपूर्ण लेख संजय. तुझ्याबरोबर फिरण्यात एक वेगळा आनंद असतो. इतिहासाची जाणीव आणि वर्तमानाची सांगड उत्तम घालतोस तू. तुझे गडकोटात हरवून जाणे हे बघण्यासारखे असते. तुझ्यामुळे एखादा ट्रेक कितीही कठीण असला तरी सोपा होऊन जातो. आमच्यासारखे लोक तुझ्याबरोबर राहून इतिहासाबद्दल जागरूक आणि जाणते होतात हे तुझे वैशिष्ट्य. हे असेच राहो.

    ReplyDelete
  4. फार छान लेख. समर्पक वर्णनामुळे खिंडीचे चित्र डोळ्यासमोर नीट ऊभे रहाते. संबधित व्यक्तीचित्रणे सविस्तर केल्यामुळे युध्दप्रसंग का, कशासाठी हे नीट कळते. स्थलवर्णनही बारक्यासारक्या गोष्टींमुळे वाचनियतर होतेच, माहीतीहि मिळते. लेख मोठा असलातरी माझ्यासारख्यांसाठी ही मेजवानीच आहे.

    ReplyDelete
  5. संजय,
    खूपच छान वर्णन...असेच लिहित रहा.

    ReplyDelete
  6. Khup chhan Dada, sagal kass aaplya dolyan pudhe ghadatay assch bhasat hot h vachataanaa Dada aamch bhaagy ki amhalaa tujhaa sahvaas labhalay...🙏

    ReplyDelete
  7. खुप छान, असेच लिहीत रहावे,
    असे वाचन घडत राहिले, तर आमच्या सारख्यांना इतिहासाची गोडी निर्माण होईल...

    ReplyDelete
  8. फार छान लेख. वर्णन शैली मुळे खिंडीचे चित्र डोळ्यासमोर नीट ऊभे रहाते. व्यक्तीचित्रणे सविस्तर आहेत स्थलवर्णनही वाचनीय आहे त्यामुळे खरच चित्रपट पाहत असल्याचा भास होतो

    ReplyDelete

Post a Comment