'मनी'ची गुज ......!

गोनीदांची 'रानभुली'

मनीची गुज...........! 

एखाद्याचं भाग्य कुठल्या वाटेने येईल ते सांगता येत नाही.  आपल्याला हवी असलेली बालपणातील एखादी गोष्ट आपल्या उतार वयातसुद्धा आपल्या जवळ असते, यापेक्षा दुसरं भाग्य ते कोणतं ? अशीच काहीशी गोष्ट एका व्यक्तीच्या बाबतीत घडतेय. ती व्यक्ती म्हणजे मनी..... हो, हो, ‘गो.नी.दांची मनी....... आप्पांची 'रानभुली'!

भर टळटळीत उन्हात रायगड चढत असताना वाटेत गडउतार होणारे आप्पा भेटले. त्यांच्या बोलण्यातून मनी गडावर आल्याचे कळले. आप्पा मनी बद्दल भरभरून बोलत होते. ही कोण मनी? तिचं गडाशी नातं काय? माझ्या मनात हाच  कुतूहलाचा प्रश्न सतत डोकावत होता. 

आप्पांचा निरोप घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि अखेर गडावरील जिल्हा परिषदेच्या पत्र्याच्या शेडच्या ओसरीमधे बगा भिरकावल्या. थोड्यावेळाने गंगासागरातील पाणी काढून यथेच्छ हातपाय धूत अर्धी आंघोळ उरकून घरचे डबे संपवले. मग सोबत असलेल्या जाणकारांच्या सोबतीने गडदर्शनाचा कार्यक्रम आटोपला. रात्री जेवणं उरकल्यावर पुन्हा एकदा चांदण्यात गडदर्शन. हा अनुभव सुखद, ज्यांनी अनुभवलाय त्यांनाच ठाऊक. मग गाढ निद्रा, झोपताना परत तिचं....... मनी.

दुसऱ्या दिवशी सकाळी पप्पा म्हणजे नंदूशेठच्या हॉटेलात गरमागरम चहा घेऊन बाहेर आलो तर समोरच्या कुंपणातील मोकळ्या जागेत विठ्ठल सूर्यफूलाच्या बिया लावत होता.

 काय विठ्ठला”. 

 “'कवा आलाव्

 कालच आलो

 बेस हाय नव्हं”. 

 हो ....  वनीकरण वाटतं!' मी म्हणालो, त्यावर विठ्ठल गोड हसला.

 'हिरकणीला जायचं होतं, येतोस”.

 आता वकत नाय, पुढल्या खेपी बघू”.

माझी गळ आणि विठ्ठलचा नकार असं हे संभाषण थोडावेळ चालू असताना आमच्यापाशी एक मुलगी येऊन उभी राहिली. बहुतेक माझ्यापेक्षा १०/१२ वर्षानी मोठी. थोडावेळ संभाषण तुटलं.

मग विठ्ठल तिच्याकडे बघत म्हणाला, “ह्यासनीं ओलंखलं?”.

मान हलवीत ती म्हणाली. न्हाई”.

आपल्या हातातील खुरपं तिच्या समोर नाचवीत विठ्ठल म्हणाला, “ह्यो संजय', न्हाई ओलखलीव्?”.

च्च्”.

मग माझ्याकडे वळून विठ्ठल म्हणाला, “हिरकनीला जायचं नं,  मग मनी घिवून जायील की, काय गो मने”.

आत्ता डोक्यातला तिढा सुटला. ती पुन्हा ' च्च् करून चालायलाचं लागली.

हा होकार समजायचा, की नकार? हा प्रश्न पडायच्या आतच विठ्ठल म्हणाला. जाताहेसना हिरकनीसला. निघा... निघा... गेली ती.

सोबत असलेल्या मंडळींना न सांगता मी तिच्या मागे धावत सुटलो. मनी पुढे, मी मागे. मनीची चाल विलक्षण. जणू वाऱ्याशीच स्पर्धा. त्यामुळे मला सतत धावावं लागे. राणीवसाच्या मागची बाजू सोडून मनी उजव्या हाताला वळली. हिरकणीच्या उतारावर मधेच कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या. पहिला टप्पा, दुसरा टप्पा पार करत आम्ही शेवटच्या भागात पोचलो. हिरकणी बुरुजाच्या शेवटच्या भागाला तटबंदी घातलेली आहे. त्यातील एका दगडावर विराजमान असलेल्या मारुतीरायाचे शिल्प आणि माचीवर विश्रांती घेत पडलेल्या तीन तोफा...... झाला हिरकणी बुरुज पाहून.

मनी आपले दोन हात बुरुजाला टेकून दूरवर पाहत होती. मी विचारलं, काय पहाते आहेस मनी?”

तो डोंगुर दिसतो हाय ना, मला तिकडे दिल्ली”.

मला काहीही कळलं नाही. बुरुजाखाली थोडी सपाटी आहे. तिकडे बोट दाखवत मी विचारलं, “तिथं पर्यंत जाता येतं?”.

पुन्हा च्च्”, .... “चला दावते म्हणत मनी बुरुजाच्या उजव्या बाजूने पुढे निघाली. जिथं बुरुज संपतो त्याच्या थोडंस पुढे तीव्र उतार लागतो त्या उतराला डावी घालावी लागते. आधाराला काही सापडेना म्हणून मी तिथंच थांबलो. मनीला माझी अवस्था कळाली. ती तशीच वर आली व माझ्या हाताला धरून मला अलगद खाली उतरवलं. अगदी भावाच्या मायेनं.

आप्पांनाबी हितनचं उतरवलं हुतंमनी.

हिरकणी खालील पठारावरचा काय तो आनंद. अहाहा... उभ्या आयुष्यात मी तो विसरु शकणार नाही.

त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मी आणि तु. वि. जाधव तथा दादाजी याच उतारावरून हिरकणी कडा उरतून खाली गेलो होतो. 'हिरकणी गवळण' याच कड्यावरून उतरून गेली होती  असं म्हणतात.

पुढे दीड-दोन वर्षांनी आप्पा गडावर भेटले. मी त्यांना म्हणालो, ”आप्पासाहेब, मला मनीने हिरकणी दाखवला”.

आप्पांनी चष्म्याच्या वरच्या बाजूने माझ्याकडे पाहिले.

पार बुरुजाखाली उतरून”,  मी म्हणालो.

धन्य तुमची! पाय टिकत नाही तिकडेकाळजीपोटी दिलेला आप्पांचा हा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठ्ठा होता.

रायगडावरील बाजारपेठेतून जाताना उजव्या हाताकडील अकरा अकरा खोल्यामधील बोळातून खाली उतरलं की रावजी बाबू अवकिरकरचं झापं लागतं. त्याची बाईल साऊबाई. हिला आठ लेकरं. गंगु, भांबू, विठ्ठल, जाई, हिरा, सीता, सखु अन् मनी. त्याकाळी लहान वयात लग्न व्हायची. त्यामुळे समज येताच मनीचं लग्न पुनाडे गावच्या शांत व सुस्वभावी असलेल्या धोंडू गजानन होगाडे याच्याशी लावून दिलं. लग्नानंतर मनीची पार्वती झाली. 

महादेवाची पत्नी पार्वती. जिथं महादेव जातील, तिथं ही पार्वती सावली सारखी त्याच्या साथीला. पण इथं प्रकार उलटा. आमच्या पार्वतीबाईनंच नवऱ्याला आपल्या मागं-मागं फिरायला लावलं. त्याला कारण तिचं रायगडावर असलेलं नितांत प्रेम. 

लग्नानंतर काही दिवसात मनी सासरहून रायगडला गुपचूप निघून आली. भांडण नाही, वाद नाही की तंटा नाही. घरात गोंधळ, आक्रोश. शोधाशोध करून सगळे थकलेत. याने पाहिलं नाही, त्यानं पाहिलं नाही, मग गेली कुठं. इतक्यात कुणी म्हटलं, रायगड वाटेनं जाताना बघितलं. मग सगळे गडावर धावले. पण तिथं ही नाही. मघाशी एक होतं, आता दोन्ही कुटूंबांची रडारड. धोंडूची अवस्था तर विचित्र झाली. काहिही दोष नसताना हे प्रकरण त्याच्यावर येणार होतं.

दुसऱ्या दिवशी आप्पा गडावर आले. त्यांना सविस्तर हकीकत कळाली. आप्पांनी अंदाज बांधला व घळी धुंडाळायला सुरुवात केली. तर ही एका घळीत निपचीत झोपलेली. अंगात ताप. आप्पांनी उठवलं. समजूत काढली, समजावलं आणि पुन्हा धोंडू बरोबर पुनाड्याला पाठवली.

काही दिवस आनंदात गेले. धोंडू मुंबईत कामाला लागला. सुदैवाने धोंडूचा साहेबही आप्पांच्या परिचयाचा निघाला. त्यांनी धोंडूची साहेबांशी ओळख करून दिली. घरही पाहून घेतलं. मग आप्पाच भरीला घालून मनीला मुंबईत सायनला धोंडूच्या बिऱ्हाडी घेऊन आलेत. नवं दांम्पत्याशी साहेबांशी ओळख सुद्धा करून दिली.

भवानी टोकाखाली दहा-बारा फूट लवाणात अडकलेल्या आपल्या गाईची रात्रभर जागी राहून रखवाली करणारी आणि वाघदऱ्याच्या तळाकडील झाडीत कालवडची नरडी वाघरु धरून ओढत असताना तिच्या सुटकेसाठी तिचे मागचे पाय धरून ओढणारी मनी, दीड दोन महिन्यांच्या आताच मुंबईच्या माणसांना पाहून बुजली. पुन्हा एकच अस्त्र! 'पलायन........!'. 

कुणालाही न सांगता मनी निघाली. चालत. रस्त्यातील लोकांना विचारी महाड कुठंय, रायगडचा रस्ता कुठंय. लोकं समोर बोट दाखवीत आणि मनी त्या दिशेला चालू लागे. पोटात अन्न नाही, पाणी नाही. चालण्याच्या अतिश्रमामुळे तिला भोवळ आली आणि मनी पनवेल खिंडी नजीक रस्त्याच्याकडेला पडली.

सुदैवाने धोंडूचे साहेब पनवेलचे काम आटोपून आपल्या गाडीने मुंबईच्या दिशेला चालले होते. कोण पडलंय म्हणून त्यांनी गाडी थांबवून उतरून पाहिलं. हिला ओळखलं व गाडीत घालून बोरिवली येथील आपल्या घरी आणून ठेवलं. आप्पांना फोन करून बोलावून घेतलं. आता हे नवीन बलाट निस्तरण्यासाठी आप्पांना बोरिवलीची वाट धरावी लागली. साहेबांच्या घरी आल्यावर सगळा प्रकार समजला. मनीला शुद्ध आल्यावर ती रडायला लागली.  “ मना इथं ऱ्हायचं न्हाई,  मना रायगडला घिवून चला. आता समजूत काढून काही उपयोग नव्हता आणि रायगडही तिला सोडवत नव्हता. परतणं भाग होत. आप्पांनी त्या दोघांनाही पुन्हा पुनाड्याला आणून सोडलं. 

लहानपणापासून रायगडावर मनापासून प्रेम करणारी, आणि आप्पांच्या रानभूली पुस्तकाची नायिका मनी, सध्या आपल्या मूलांनातवंडांसमवेत पुनाडे गावातील रस्त्यालगत असलेल्या आपल्या राहत्या घराच्या उंबरठ्यावरून, दूरवर दिसणाऱ्या रायगडाकडे पाहत आपले जूने दिवस आठवीत असते. 

मी आणि मनोज नाईकसाटम त्याच्या कुटुंबासमवेत नुकतेच तिला भेटून आलो. तसा खुप वर्षापूर्वी चार पाच वेळा तरी तिला भेटलो होतो. तरी ओळख दाखवावी लागली.

कुणी भेटायला बी येत न्हाई”, ती म्हणाली.

तिला ती खंत जाणवत असावी. साडीचोळी दिल्यावर खूप रडली. मनोजनेही खिशात हात घातला. निघताना तिने माझा हात हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. तिच्या मायेच्या ओठाचा ओलसर स्पर्श मला क्षणभर भूतकाळात घेऊन गेला.

सद्या मनी काहीशा हालाखीच्या परिस्थितीत आहे. त्यातून दुखण्याने डोकं वर काढलंय. त्यामुळे तिला मदतीची सुद्धा तितकीच गरज आहे. जे कुणी रायगडहुन पाचाड, पुनाडे, घरोशीवाडी मार्गे माणगाव किंवा निजामपूरला जात असतील त्यांनी पुनाडे गावाची वस्ती येण्याअगोदर २३७, पुनाडेवाडीला थांबा. जरूर मनीला भेटा, बोला, शक्य असल्यास मदत करा. का कुणास ठाऊक?

पण त्यामुळे नक्कीच मनीच्या गालावरचं हसू पुन्हा एकदा दिसू लागेल.

भगवान सूत संजय तळेकर

(संजय उवाच)

९८२०२३८१७७

Digiproved: 25 April 2022 16:59:55 UTC, Certificate No.: P1484864

ह्या लेखातील मजकूर अथवा छायाचित्रे यांचे डिजिटल कॉपीराईट्स श्री. लेखक संजय भगवान तळेकर यांच्याकडे सुरक्षित!











ह्या लेखातील मजकूर अथवा छायाचित्रे यांचे डिजिटल कॉपीराईट्स श्री. लेखक संजय भगवान तळेकर यांच्याकडे सुरक्षित!



Comments

  1. दादा, अतिशय सुंदर लेखन केलेय. वाचताना संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मला देखील एकदिवस तुझ्याबरोबर रायगडाला भेट देताना मनी आजींना भेटायला आवडेल.

    ReplyDelete
  2. जबरदस्त, संजय फारच छान .
    एका दुर्लक्षित रायगड प्रेमीची व्यथा तु समोर आणलीस. तुच आमच्या ग्रुपची भेट घालुन दिली होती, तुला फार फार धन्यवाद.
    पुढच्या रायगड भेटीत वेळ काढुन मनी ताईची भेट नक्कीच घेईन यथाशक्ती मदतही करीन.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर , संजय तू येवढं सुंदर लिहितोस हे कधी माझ्या समोर आलाच नाही . तुझ डोंगरा वराच इतिहासा वरच आणि निसर्गावरच प्रम आणि तुझी भटकंती हे मी अनुभवलं आहे पण तुझ्या मधाल्या लेखनाची बाजू आज प्रथमच अनुभवली.
    अतिशय सुंदर..
    भविष्यात तुझ्या हातून कुठलं तरी पुस्तक लिहिलं जाव आणि वाचायला मिळेव हीच सदिच्छा.

    ReplyDelete
  4. संजय, कमाल केलीस. एकतर मनी शोधलीस. खरतर तुला आधीच सापडली होती. मला आता सापडली. आणि तू ती सापडवलीस.

    रानभुली वाचल्याला खूपच वर्ष झालीत. पण मनी मनात होती. पूनाडे मार्गाने जाताना मुद्दाम लक्षात ठेऊन भेटायला हव.

    धन्यवाद तुला

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर लिहिले आहे.एकदा गो.नि.दा. च्या नायिकेला भेटायलाच हवे.

    ReplyDelete
  6. धन्यवाद संजय! निव्वळ तुझ्यामुळेच मनीची भेट होऊ शकली.

    ReplyDelete
  7. अतिशय छान लेख.
    खूप खूप धन्यवाद मित्रा संजय.
    👍🙏👌

    ReplyDelete
  8. नेहमीप्रमाणे संजयचा लेख सुंदरच! रानभुली कादंबरी पहील्यांदा वाचली तेव्हाच आवडली होती कारण ते खास गोनिदांच्या शैलीतलं लिखाण होतं! आत्ता संजयने तोच आनंद पुन्हा दिला. मनीलि भेटायला हवंच!

    ReplyDelete
  9. अप्रतिम लिखाण. आप्पांचे प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाल्यावर तुला जितके धन्य वाटते, आणि तुझा सहवास आणि मार्गदर्शन मिळते तेव्हा आम्हाला धन्य वाटते.

    ReplyDelete
  10. संजय, नेहमीप्रमाणेच तुझ्या लिखाणाची शैली अत्युत्तम. यावेळी तर मनी सर्वांना भेटवलीस ‌‌खरच जायलाच हवं मनीला भेटायला.

    ReplyDelete
  11. तुमच्या लिखाणातून मनी थेट काळजाला भिडली. अप्रतिम लिखाण !

    ReplyDelete
  12. संजय दादा खूपच छान लेख आहे. या लेखातून एका दुर्लक्षित अशा रायगड प्रेमीची ओळख झाली. ह्या लेखामुळे मनी आजी ला भेटायची इच्छा झाली. धन्यवाद दादा.

    ReplyDelete

Post a Comment